-------------------------------------------------------
🌐 "कृष्णाकाठ न्यूज"📝 ¦ Since : 2010
कृष्णाकाठच्या खास स्टोरीजचं दर्जेदार व्यासपीठ..!
-------------------------------------------------------
पोतराज हा शब्द म्हणजे ‘पोत्तुराजु’ या तमिळ शब्दाचे रूपांतर होय. शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेत ‘सात बहिणी’ या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्धआहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला ‘पोत्तुराजु’ म्हणतात. मरीआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला मरीआईवाला व लक्ष्मीआईवाला अशीही नावे आहेत.
पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा ‘कडकलक्ष्मी’ आली असे म्हटले जाते.पोतराजाच्या हातातील कोरड्याला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी हे नाव मिळाले,
पोतराज पुरुष असूनही तो बहुतांशी स्त्रीवेषात असतो. त्याच्या कंबरेभोवती असलेला हिरव्या खणांचा घागरा हा लिंबाचा पाला नेसण्याच्या प्रथेचा अवशेष असण्याची शक्यता आहे. त्याच्या कंबरेच्या वरचा भाग उघडा असतो दाढी राखलेली नसते पण मिशा मात्र असतात. त्याने स्त्रियांप्रमाणे वाढविलेल्या केसांचा बहुदा अंबाडा बांधलेला असतो व कपाळावर हळद व कुंकू यांचा मळवट असतो. डोक्यावर मरीआईचा देव्हारा व हातात मोरपिसांचा कुंचा घेतलेली त्याची पत्नीही त्याच्याबरोबर असते.
मरीआईच्या देव्हाऱ्याचे दार उघडावे आणि तिने प्रसन्न व्हावे, यासाठी पोतराज आत्मपीडनाचा मार्ग पत्करतो. नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभोवती मारणे, दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खुपसणे, दातांनी स्वतःच्या मनगटाचा चावा घेणे इ. प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो.
त्यानंतर देव्हाऱ्याचे दार उघडते. त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते.
त्यांच्या उपेक्षित जगण्याला स्थिरता प्राप्त व्हावी, शासन दरबारी त्यांची दखल घेतली जाऊन त्यांचे रहाणीमान उंचवावे हीच अपेक्षा..!
-------------------------------------------------------
🌐 "कृष्णाकाठ न्यूज"📝 ¦ Since : 2010
कृष्णाकाठच्या खास स्टोरीजचं दर्जेदार व्यासपीठ..!
-------------------------------------------------------
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.