"कृष्णाकाठचं पक्षी वैभव" पुस्तक रूपात यावे :प्रांताधिकारी गणेश मरकड.
पलूस l दि.३०/१/२०२१
"महाराष्ट्राभर फार मोठी जैवविविधता पहायला मिळते. या जैवविविधतेचे जतन, संवर्धन आणि डॉक्युमेंटेशन गरजेचे आहे. कृष्णाकाठ या बाबतीत अतिशय संपन्न आहे. या परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि येथील विविध पक्षांचे चित्रण आपण उत्कृष्ट रित्या करता आहात. या विडियो डॉक्युमेंटरी बरोबरच "कृष्णाकाठचं पक्षी वैभव" पुस्तक रूपात येणे गरजेचे आहे. पक्षांचे माहितीसह रंगीत फोटो यामध्ये असावेत. हे पुस्तक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल."
अशी आशा प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी "कृष्णाकाठचं पक्षी वैभव" डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर पलूस येथे व्यक्त केली.
पलूस तालुक्यातील ३३ गावांची सरपंच आरक्षण सोडत मा. मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस येथील शिवशंकर चित्रमंदीर येथे पार पडली. या सोडतीनंतर पलूस कडेगावचे प्रांताधिकारी आणि साहित्यिक गणेश मरकड यांची बालभारतीच्या पाठाचे लेखक, पत्रकार संदीप नाझरे यांच्यामध्ये अनौपचारिक गप्पा रंगल्या.
मरकड यांनी "कृष्णाकाठचं पक्षी वैभव" ही प्रदर्शनाच्या वाटेवर असणारी डॉक्युमेंटरी पहाण्यासाठी आवर्जून वेळ दिला. यावेळी प्रांताधिकारी मरकड यांनी संदीप नाझरे यांच्या "कृष्णाकाठचं पक्षी वैभव" मधील चित्रणाचे कौतुक करताना या पक्षांवर पुस्तक प्रसिद्ध करावे अशी आशा व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार निवास ढाणे, नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्यासह पत्रकार अक्तर पिरजादे, जमीर सनदी उपस्थित होते.
संदीप नाझरे निर्मित ड्रिमआर्ट प्रस्तुत, "कृष्णाकाठचं पक्षी वैभव" या माहिपटच्या माध्यमातून कृष्णाकाठावर आढळणाऱ्या जवळपास शंभर प्रकारच्या स्थानिक तसेच देश विदेशातून स्थलांतरीत पक्षांचे दर्शन होणार आहे. पलूस आमणापूर गावाचे अनोखे चित्रण या निमित्ताने पहायला मिळणार आहे. सांगली आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी संजय पाटील यांचे बहारदार निवेदन असलेला हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.