Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

बँकिंग क्षेत्रातील कोरोना योद्धे - नक्की वाचा

( बँकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनावर विचार करणारा एक लेख.)पप्पा आले...! पप्पा आले...! असं बोलून उड्या मारत मारत पाच वर्षांची मृण्मयी आपल्या वडिलांना मीठी मारणार, तेवढ्यात तिच्या आजीने जोरात धपाटा देऊन तिला लांब केले. "किती वेळा सांगितलं...? बापाने आंघोळ केल्याशिवाय त्याच्या जवळ जायचं नाही म्हणून"? आजीने ओरडत मृण्मयीला बेडरूम मध्ये नेले.


अगं पण आजी, माझे पप्पा तर बँकेत कामाला जातात. त्यांना कसा काय होईल कोरोना? मृण्मयी आजीला सांगत होती.
कसा होईल म्हणजे? कित्येक लोकं पैसे भरतात, चेक भरतात, बँकेत ये-जा करत असतात, काय माहीत कोण, कुठून आलंय. नाक मुरडत आजी मृण्मयीला समजावत होती.


ही गोष्ट किती साधी आहे ना! पण दिवसभरातून आपल्या मुलीला कवेत घेण्यासाठी उत्सुक असलेल्या बाबाला झालेल्या दुःखावर कोणाचं लक्षच नव्हतं. त्याच्या मनाची झालेली घालमेल कोणाच्याच लक्षात आली नाही. असाही बँकेत काम करणारा कर्मचारीवर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिलाय. आज अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी म्हणजेच डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि ईतर ह्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सगळे बोलताना दिसतात. त्यांची स्तुती झालीच पाहिजे, कारण तशी त्यांची मेहनतच आहे. आज प्रत्यक्ष त्यांचा संपर्क कोरोनाबाधित रुग्णांसोबत येतो. परंतु बँकेत काम करणारे कर्मचारी ह्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काय? सध्याच्या दिवसात कश्या परिस्थितीतुन जातात हे बँकर? कधी विचार केलाय का? आता तुम्हाला लगेच मनात येईल की, पगार घेतात ना.! मग केलं तर काय होतंय? बरोबर आहे आपला विचार...! म्हणूनच ह्या लेखाचं नाव मुद्दाम "पैसा झाला खोटा"असं ठेवलंय.


कोरोना महामारीच्या काळात, सर्व बँकांना अत्यावश्यक सेवा म्हणून नियमितपणे चालू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले. बँकेच्या कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत तरीही सगळ्या सेवा मात्र चालू आहेत. ह्यात सगळ्यात जास्त भीती आहे, ती म्हणजे कॅशिअर आणि चेक क्लिअरिंग ऑफिसरला. बँकेत व्यवहार करताना वापरात येणाऱ्या नोटा कोणाच्या संपर्कात आल्या असतील ह्याचा काहीच अंदाज लावू शकत नाही. पैसा हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, परंतु ह्या काळात काही बँकेच्या अधिकाऱ्यांना हाच पैसा जीवघेणा ठरतोय. वेगवेगळ्या बँकेत, जवळ जवळ ३०० अधिकारी कोरोनाबाधित आहेत आणि २८ च्या वर अधिकारी आपला जीव गमावून बसले आहेत.


गेल्या आठवड्यात एका राष्ट्रीयीकृत बँकेत अवघ्या ३१ वर्षाच्या मुलाचा बळी गेला. पत्नी आणि १० महिन्याची मुलगी नशिबाला दोष देत आहेत. आभाळाएवढया दुःखावर फुंकर घालण्यासाठी बँकेकडून विम्याचे ८ ते १० लाख मिळतील. शासनाने बँक वगळता ईतर सेवेतील कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमाकवच दिलेले आहे. मग ह्या सगळ्यात बँकेचे कर्मचारी शापित का? एरव्ही बँकेला ४-५ लागोपाठ सुट्ट्या आल्या की, न्यूज चॅनेल, वृत्तपत्र, सोशल मीडिया लगेच कार्यरत होतात, मग आता एवढ्या महिन्यात एकही बातमी का करावीशी वाटली नसेल?

खूप जणांना असा गैरसमज आहे की, सगळं बंद असताना कोण जातंय बँकेत? बँकेत काम करणाऱ्या आम्हा सगळ्यांना सुद्धा असंच वाटत होतं. परंतु प्रत्यक्ष चित्र एकदम उलट आहे. बाहेर पडायला कारणं मिळत नाही म्हणून बँकेच्या कारणाने कित्येकजण बाहेर पडतात. क्षुल्लक कारणाने बँकेत गर्दी झालेली दिसते. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात कित्येक कॅश बँकेत भरली गेली आहे असं चित्र समोर आलं आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो दरात कपात केल्याने, मुदत ठेवींवरील व्याज कमी होण्याची शक्यता आकारून, मुदत ठेवी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवर पैसे गुंतवण्यासाठीसुद्धा बँकेत गर्दी होऊ लागली.

त्यातच ६ महिने हप्ते न भरण्याची खुशखबर शासनाने दिली खरी, परंतु शेवटी हे सगळं काम बँकेच्या कर्मचाऱ्यांनाचं करावं लागलं ते सुद्धा २ वेळा. आधी ३ महिन्यांसाठी सगळ्या कर्ज खात्यात बदल करतो ना करतो, तोवर पुढच्या ३ महिन्याची घोषणा झाली.


आजपर्यंत आलेल्या बऱ्याचश्या योजना ह्या बँकेच्या संदर्भात आलेल्या आहेत आणि त्या यशस्वी करण्याचं उल्लेखनीय काम बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कसलीही अपेक्षा न करता केलेले आहे. मग ती नोटबंदी असो, मुद्रा योजना असो, प्रधानमंत्री जन धन योजना असो. प्रधान मंत्री बिमा योजना(रु. ३३०/- आणि रु.१२/-), अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधान मंत्री आवास योजना, अश्या कित्येक योजना बँकेच्या मार्फतच राबवल्या जातात.

आज सुद्धा ह्या कठीण काळात बँकेचे कर्मचारी आपली ड्युटी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडत आहे. देशाला आपला हातभार लागावा ह्यासाठी हे कर्मचारी नेहमीच आपले योगदान देत आले आहेत. ह्यामध्ये तरुण कर्मचारीच नव्हे तर, डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असलेले, लहान मुलांना घरी सोडून आलेल्या माता, गरोदर स्त्रिया ह्या अविरत सेवा करत आहेत.


आज जी अवस्था डॉक्टर, नर्स, पोलीस ह्यांची आहे तशीच अवस्था बँकरची सुद्धा आहे. मुलांना प्रेमाने जवळ घेता येत नाही. घरात राहून सुद्धा घरात वावरू शकत नाही. सतत एकचं विचार मनात असतो, आपल्यामुळे आपल्या घरात कोणाला कसलाही त्रास होऊ नये. माझी एक मैत्रीण बँकेत जॉब करते आणि तिचे पती डॉक्टर आहेत, अश्या परिस्थिती मध्ये काय अवस्था असेल दोघांचीही? दोघेही आपले कर्तव्य पार पाडून घरी जातात खरे, परंतु मुलांना प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही. शेवटी बँकर सुद्धा माणूसच आहे आणि त्याला सुद्धा भावना आहेतच.

हा लेख शासनाकडून आम्हाला मदत मिळावी ह्या उद्देशाने लिहिलेला नाही तर, नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या बँकरला एक कौतुकाची थाप मिळावी ह्यासाठीचा एक प्रयत्न आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून बँका चालू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु मुंबईमध्ये ज्या रेल्वे चालू झाल्या आहेत त्यामध्ये मात्र बँकरला प्रवेश नाही. असो, तरीही आम्ही आमचे कर्तव्य पार पाडून बँक चालू ठेवणार आहोतच.


जर बँका बंद राहिल्या तर अर्थव्यवस्था कशी चालणार? मोठ्या प्रमाणावर पैश्यांची देवाणघेवाण ही विविध बँकांमार्फत होत असते. परंतु सध्या बँकरच्या आयुष्यात देवाण घेवाणीच्या ह्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या पैश्यांमुळे जीवाला धोका पोहोचत आहे. म्हणूनच ह्या काळात बँकरसाठी हाच *पैसा झालायं खोटा.


आम्हाला खूप काही अपेक्षा नाहीत, पण निदान पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा.


( सर्व बँकेत धैर्याने जनसेवा करणाऱ्या बँकेतील योध्यांना हा लेख समर्पित..)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.