Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णाकाठचे समर्पित व्यक्तिमत्त्व - शिवराम (बापू) यादव

 कृष्णाकाठचे समर्पित  व्यक्तिमत्त्व- शिवराम(बापू) यादव 

डॉ. संतोष माने / सांगली.


सर्वसामान्याच्या  विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व इतिहासात  प्रेरणादीप बनून चिरंतन कार्यरत राहतात. असे  प्रेरणादीप समाजात फार थोडे असतात.  कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर समाजाच कल्याण करण्याची जिद्द

आयुष्यभर जोपासणारे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, कृष्णाकाठचे समर्पित  व्यक्तिमत्त्व- स्वर्गीय शिवराम(बापू) यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त......

सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी हे शिवराम बापूंचे जन्मगाव. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या बापूंनी आपल्या कुटुंबाचा दातृत्वाचा,  कर्तृत्वाचा व

सामाजिक कार्याचा वारसा  त्यांनी आपल्या कार्यातून चिरंतन जोपासला. मला समजायला लागले तेंव्हापासून शिवराम बापू हे नांव परिचयाचे आहे. कारण  पलूस तालुक्‍यातील चोपडेवाडी हे ही माझे जन्मगांव. लहानपणापासून ते आत्तापर्यंत बापूंच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याचा सहवास मला लाभला. त्यांच्याबरोबर कार्य करायला मला संधी मिळाली हे माझे भाग्यच. चोपडेवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, केलेला त्याग, समर्पण कोणीच विसरू शकणार नाही.

बापू भिलवडी पंचक्रोशीतील नव्हे तर सांगली जिल्ह्यातील कसलेले, मुरब्बी राजकारणी होते. त्याचबरोबर ते निस्पृह समाजकारणीही होते. कृष्णा काठावरील राजकारणाचा इतिहास लिहीत असताना येणाऱ्या आघाडी प्रर्वात त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. शालेय जीवनातच समाजसेवेची स्फूर्ती घेऊन बापूंनी १९६७ पासून जिद्दीने समाजकार्यास सुरुवात केली होती. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा बापूंच्यावर प्रचंड प्रभाव होता. वयाच्या २३ व्या वर्षी ते  तासगाव पंचायत समितीचे सदस्य म्हणून राजकारणामध्ये सक्रिय झाले. तीन दशकावून अधिक काळ ते चोपडेवाडी गावचे बिनविरोध सरपंच म्हणून कार्यरत राहिले होते. डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, हिंदकेसरी मारुती माने, प्रकाश बापू पाटील,  विष्णू आण्णा पाटील, नाना महाडिक, मदन पाटील, आ.मोहनराव कदम यांच्या संपर्कातही आले. त्यांच्या देखील विचारांचा, राजकारणांचा बापूंच्यावर प्रभाव होता. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, समाजातील दलित, पीडित, अल्पसंख्यांक यांच्यासाठी बापूंनी पंचक्रोशी मध्ये जे काही कार्य केलेले आहे ते प्रेरणादायीअसे आहे.

कृष्णाकाठचे चौफेर नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बापूंनी समाजातील विविध क्षेत्रात अनेक पदावरती निरपेक्षपणे कार्य केले आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, तासगाव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक,भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, तासगाव पंचायत समिती सदस्य, पलूस तालुका देखरेख संघाचे संचालक, जायंटस् ग्रुपचे पदाधिकारी, लक्ष्मी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आदी पदावर बापूंनी  निस्वार्थपणे कार्य करून आपली स्वतःची समाजात मोहर उमटवली आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाकावर राहिलेल्या बापूंनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रामध्ये आपले महत्त्व कायम राखले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये गेली साठ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणारे बापू भिलवडी पंचक्रोशीचे खंबीर नेते म्हणून ते सर्वाना परिचयाचे होते. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम, कै. मारुती माने, कै.प्रकाश बापू पाटील,  कै. विष्णू आण्णा पाटील,  कै.नाना महाडिक, कै. मदन पाटील यांच्या सहित मोहनराव कदम,  डॉ. बाळासाहेब चोपडे, चितळे परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ, कौटुंबिक संबंध होते. बहुजन समाजातील सर्वसामान्यपासून, गोरगरीब, दलित यांच्यापासून ते उच्चभ्रू समाजातील अनेक मान्यवर व्यक्तीशी तसेच वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील  प्रशासकीय अधिकारी, नेते ,पदाधिकारी यांच्याशी बापूचे जवळचे घरगुती संबंध होते. समाजातील विविध क्षेत्रातील संबंधित व्यक्ती बापूंच्याकडे आल्यानंतर  रिकामा हाताने व पाहुणचार न घेता तो कधीच परत गेला नाही. जनसेवेचे कंकण बांधलेल्या बापूंच्या या दातृत्वगुणामुळे सर्वसामान्य जनतेला ते आपलेसे वाटत होते. 

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, चोपडेवाडी या छोट्याशा ग्रामीण भागातील गावातून बापूनी आपल्या स्वःकर्तुत्वावर समाजातील सर्वसामान्यांच्या हृदयासिहासनावरती  प्रतिमा निर्माण करून आपला सामाजिक जीवनामध्ये ठसा उमटविला आहे. हे आत्ताच्या राजकीय युवा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असे कार्य बापूंचे आहे.

भिलवडी शिक्षण संस्थेचे बापू अनेक वर्ष उपाध्यक्ष  राहिले आहेत. संस्थेच्या जडणघडणीमध्ये व प्रगतीमध्ये बापूचा सिंहाचा वाटा आहे. राजकारणाबरोबर बापू उत्तम प्रशासक होते. वंचित आणि गरिबांच्या विकासासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. बापू म्हणजे जमिनीशी जोडलेले नेते होते. सर्व पक्षातील नेत्यांच्या मनात त्यांच्याप्रति आदराचे स्थान  होते.सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते असामान्य व्यक्तिमत्व होते.

सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्यातून बापूंनी अनेक माणसं जोडली आहेत. सर्वसामान्य जनतेशी त्यांची बांधलेली नाळ ही घट्ट होती. बापूंच्या जीवन प्रवासात अनेक चढ उतार आलेले आहेत. त्यांना सुरुवातीपासूनच  अनेक वेळा त्रास झालेला आहे, कारण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या पाठीमागे नव्हती. प्रचंड इच्छाशक्ती, समाजाच कल्याण करण्याची जिद्द, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी, बहुजन पिढीचा उद्धार हे स्वप्न उराशी बाळगून अनेक राजकीय, सहकार शिक्षण क्षेत्रातील विविध पदावरून कार्य करून त्यांनी सामाजिक कार्याचे विश्व निर्माण केलेले आहे. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.  

देव कुणी पहिला नाही परंतु गोरगरीब, असह्य वेदनेने कळवणाऱ्या रुग्णाला, थकलेला, तहानलेल्या, भुकेलेल्यांच्या मदतीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व्यक्तीमध्ये देव अंतर्भूत असतो. जनकल्याणासाठी कार्यक्षम असणार्‍या व्यक्तीच्या अंतःकरणात देव असतो.  निस्वार्थीपणे जनकल्याणाचे कार्य करणारे बापू हे सर्वांनी पाहिलेले दैवत आहे.पण आज देव देवाऱ्यात नाही, ही सर्वांच्या मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. बापू आज आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही.


देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशा काही कवितांच्या ओळी बापूंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या होत्या. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती व सर्वसामान्य नेहमीच बापूंच्याकडे विविध प्रसंगी येत असत. त्यांना बापूंनी कधीही रिकामे हाताने, प्रश्नाची सोडवणूक न करता परत पाठवले नाही. सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती पदाधिकारी बापूंच्याकडे नेहमी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येत असत. अन्नदाता म्हणून बापू भिलवडी पंचक्रोशीत सर्वांना परिचित आहेत.

सतत काहीतरी ते देत राहणे हाच धर्म त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांचे हे स्वभाव वैशिष्ट्य प्रत्यक्ष मला अनुभवता आले.

काळ कोणाकरिता थांबत नाही हे खरेच आहे पण काळावरही मात करून  कालचक्रावर नाव कोरण्याची किमया करणाऱ्या व्यक्ती जेव्हा जग सोडून जातात तेव्हा त्यांच्या मागे राहते ती कालचक्राची गती आणि त्या कालचक्रावर त्यांनी उमटविलेला अमीट ठसा. असेच सर्व सामान्य माणसाच्या हृदयात चिरंतन स्थान निर्माण करणारे  बापू हे होत. आपल्या सगळ्यांचे ऊर्जा स्तोत्र असणारे बापू आता देहरुपाने आपल्यात राहिलेले नाहीत. हे सत्य स्वीकारायला खूप कठीण आहे पण ते आपल्या विचार आणि स्मृतीमध्ये नेहमी जिवंत राहतील.

देशाचे नागरिक म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना बापूच्यांमध्ये कायम दृढ होती. त्यांच्यातला माणूसपणाची आणि सामाजिक कार्याची जाणीव त्यांच्या लोकप्रियतेतून कायम टिकून आहे.पण आज बापू जरी देह्याने नसले तरी त्यांच्या अनंत आठवणी मधून आपणा सर्वांना कायम प्रेरणा, चैतन्य मिळत राहील. यात तीळ मात्र शंका मनामध्ये नाही. शालेय जीवनापासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचे कंकण  बापूंनी बांधून जोपासलेला सामाजिक कार्याचा पिंड  आपण  निरंतर तेवत ठेवूया हीच  बापूच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त खरी आदरांजली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.