कृष्णेच्या २०१९ च्या प्रलयंकारी महापुराला वर्ष पूर्ण
“डॉ.विश्वजीत कदम यांनी उभारलेलं मदतकार्य राज्यात आजही आदर्शवत”
“डॉ.विश्वजीत कदम यांनी उभारलेलं मदतकार्य राज्यात आजही आदर्शवत”
अमोल वंडे / भिलवडी-सांगली | दि.४ ऑगस्ट २०२०
आज जगावर कोरोनाचं संकट आहे..यापासून वाचण्यासाठी प्रशासन घरी राहण्याच्या सूचना देत आहे...परंतू राहण्यासाठी हे घरच नसेल तर ...
असचं महाप्रलयंकारी संकट कृष्णाकाठावर २०१९ चा पावसाळा घेऊन आला.“नेहमीची येतो पावसाळा” अशाच प्रमाणे पावसाळा सुरु झाला होता अगदी २० जुलै आला तरी पावसाचा थेंब नव्हता,मात्र त्या नंतर अवघ्या १४ दिवसात पाऊस असा कोसळला की दि.३ व ४ ऑगस्ट च्या मध्यरात्री भिलवडी पुला वर रात्री ३.०० ला पाणी आले. सगळ्यांचा अंदाज चुकवत पाणी भर भर वाढत होते.वाढणारा पाण्याचा हा वेग कृष्णाकाठच्या इतिहासात काहीतरी वेगळचं लिहून जाणार होता..फक्त त्या भीषण परिस्थितीची त्यावेळेस कुणाला जाणीव नव्हती इतकचं.
जसं जसं पाणी वाढत होत तसं तसं भिजलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात इतक्या आगतिकतेने लोकं संसार वाचवत घराबाहेर पडत होते..त्याचवेळेस प्रशासना तर्फे सकाळी १० वा.पासून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.२००५ च्या महापुराच्या अंदाजावर लोकं आपल्या घरात पाणी येणारच नाही असे आश्वस्त होते..आणि खरा घात तिथेच झाला.
गावोगावी स्थानिक नावाडी व इतर माध्यमातून लोकांना बाहेर काढले जात होते.स्थानिक स्तरावर बाहेर पडण्याचे प्रयत्न होत होते पण आव्हान मोठे होते. असे असले तरी गावच्या गाव पाण्याखाली जात होती तत्कालीन प्रशासनातर्फे अत्यंत मर्यादित मदत होत असतानाच पलूस तालुक्यात कृष्णाकाठावर आ.डॉ.विश्वजीत कदम पाय रोवून या संकटात उभे राहिले.२००५ साली डॉ.पतंगराव कदम साहेबांनी पूर परिस्थिती मोठ्या कौशल्याने व धैर्याने हाताळली होती त्यावेळचा अनुभव गाठीशी तर होताच पण ग्रामस्थांच्या स्थलांतराकरिता नियोजन,त्यांची बाहेर राहण्या-खाण्याची सोय मोठ्या प्रमाणावर करण्याचे खरे आव्हान होते. या परिस्थितीला सामोरे जात सुरवातीला शासनाच्या सोबतच आपल्या स्वत:च्या माध्यमातून मदत व पुनर्वसन यंत्रणा उभी केली केली.आपली संस्थेच्या इमारती व इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली.वाढणारं पाणी आणि कोसळणारा पाऊस यामुळे लोकांचा धीर सुटत चालला होता..प्रत्येक गावात जाऊन त्या त्या ठिकाणच्या यंत्रणेला कार्यरत ठेवण्याचे काम बाळासाहेबांनी केले.
५० फुट अजस्त्र प्रवाहात आपला जीव धोक्यात घालत जीवाची बाजी बाळासाहेबांनी लावली.आपल्या सोबत पाण्यात उतरून बाळासाहेब करत असलेलं काम बघून ग्रामस्थांना धीर येत होता.स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची मोट बांधून आपल्या कार्यकुशल नेतृत्वाच्या जोरावर महापुराच्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न बघून आपल्या हक्काचा माणूस आपल्या सोबत असल्यान लढण्याच धैर्य जाणवत होत.कृष्णाकाठावर इतक्या ताकदीने मदतकार्य उभा करूनही दि.८ ऑगस्ट चा दुर्दैवी प्रसंग घडला, नावेतून बाहेर पडत असताना ब्रम्हणाळ येथे १७ जणांचा नाव पलटून दुर्दैवी जीव गेला. या घटनेनं प्रशासकीय स्तरावर मदत येऊ लागली ,त्याच दिवशी दु.२.०० ला उच्चांकी पाणी पातळी गाठल्या नंतर पाणी वाढण्याचा वेग मंदावला व पाणी पातळी प्रथमच काहीशी कमी झाली.
आपल्या डोळ्यासमोर संसार वाहत जात असताना पाहून होत असलेला सर्वसामान्यांचा आक्रोश ह्दय पिळवटून टाकणारा होता. त्यांना आधार देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं.पूर ओसरल्यानंतर भारती विद्यापीठ,सोनहिरा साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. त्याचसोबत आरोग्याची काळजी घेत साथीचे आजार पसरू नयेत म्हणून भारती हॉस्पिटलची यंत्रणा कार्यरत ठेवली. पुनर्वसनाकरिता प्रशासकीय स्तरावर मदत मिळवून देण्याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर करती आराखडा सादर करून मागण्या पूर्णत्वास नेल्या व सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम मोठ्या जिद्दीने केले.
कृष्णेचा महापूर खूप काही घेऊन गेला,बरंच काही शिकवून गेला,राज्यातून मदत उभा राहिली.प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. हा कृष्णाकाठ त्या ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या ,संस्थांच्या सदैव ऋणात तर आहेच पण या सर्वात कृष्णेचा २०१९ चा महापूर व तितक्याच ताकदीने संकटात खंबीरपणे उभा राहत आ.डॉ. विश्वजीत कदम अर्थात बाळासाहेबांनी केलेली मदत ,दाखवलेले धैर्य हा कृष्णाकाठ सदैव स्मरणात ठेवेल हे मात्र निश्चित.
प्रतिक्रिया द्या : http://wa.me/919890546909
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.