संक्रातीचे दान - देणे समाजाचे
- सौ. अरुणा अमोल सूर्यवंशी / अंकलखोप ता पलूस | दि.१४/०१/२०२२
भारतीय संस्कृतीत वेगवेगळे सण, व्रत साजरे केले जातात. त्यामागील उद्देश आपण समजावून घेतला तर खऱ्या अर्थाने आपणास निखळ आनंद व समाधान प्राप्त होते. सर्वच साजरे होणारे सण हे सर्व समावेशक आहेत. आपल्या बरोबर समाजातील सर्व घटकांना आनंद झाला पाहिजे यादृष्टीने जातीभेद, भाषावाद, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता सण साजरे केले जातात हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
प्रत्येक वेळी माझ्या परीने गरजवंताना दान करून आनंदरुपी पुण्याची कमाई करायची, आणि माझी आजे सासरे स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार स्वर्गीय दत्ताजीराव सूर्यवंशी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा हाच मनी संकल्प करून माझे जगणे गोड केले.
याच पध्दतीने मानवी जीवन जगत असताना दानाला अतिशय महत्त्व आहे. दानाचे महत्त्व अधोरेखित करणारा संक्रातीचा सण.खरंतर हा सण सुवासिनीचा सण म्हणूनच आपल्या संस्कृतीत परिचित आहे, कारण या दिवशी सुवासिनी बायका संक्राती पूजन करून ववसा पूजतात. हळदीकुंकू व वाण देऊन हा सण साजरा करतात व त्याच बरोबर या सणाची भौगोलिक शास्त्रीय माहिती आपणा सर्वांना माहीत आहे. संक्रातीचे हे वाण हे अनमोल दानच आहे.
यावर्षीची माझी संक्रात खरीखुरी साजरी झाली. यातून मला चिरंतन आनंद मिळाला. हाच आनंद मी आपल्या सगळ्यांना तीळगुळ प्रमाणे वाटणार आहे.
तुम्हा सर्वांना मला सांगणेस आनंद होतो की माझी मैत्रीण सौ रुपाली मोकाशी पाटील रा.वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे दिव्यांगांसाठी संस्था चालवते. तिने परवा आमच्या एसएससी 1995 च्या व्हाट्सअप ग्रुप वरती एक मेसेज पाठवलेला होता, की तुम्ही संक्रांतीचं वाण सुवासिनींना देता तसंच त्यादिवशी एखाद्या गरीब, गरजू व विधवा महिलांना दान स्वरूपात एखादी वस्तू जी त्यांना उपयोगी पडेल ती द्यावी. नेमकं तेच ध्येय मी लक्षात ठेवलं आणि याच गोष्टीवर विचार केला. बसल्या बसल्या मला हे सुचलं की, अरे आपण हे करायचं ।आणि खरच मी ते करून दाखवलं.
संक्राती दिवशी एका 90 वर्षीय गरीब, निराधार व विधवा असणाऱ्या आबी या नावाने परिचित असणाऱ्या महिलेला संक्रातीचा दान दिलं. आबी या स्वतः पैसे मिळवून उदरनिर्वाह करतात. त्यांना परवा गॅस सिलेंडर मिळाला आहे ही गोष्ट ध्यानात आणून त्यांच्यासाठी उपयुक्त वस्तू कोणती असेल हे मी ठरवले आणि त्यांना वेळेची बचत म्हणून प्रेशर कुकर दान स्वरूपात दिला. जेव्हा ती वस्तू मी त्यांच्या हातात दिली तेव्हा त्यांनी मला अक्षरशा मिठीच मारली. डोळ्यात पाणी आले ते पुसतच मला म्हणाल्या, तुमचे उपकार मी कसे फेडू. मी त्यांना म्हटले तुमचा आशीर्वाद देऊन, खरं सांगायचं झालं तर त्यांची ती मिठी जणू मला अजूनही चांगले काम करण्याची ऊर्मी देऊन गेली.
आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव कुठेतरी मनामध्ये घर करून राहिली. मला स्वामी समर्थांचे ते विचार ध्यानात आले ते म्हणत, मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे.
मला समाजातील सर्व महिलांना याद्वारे एकच सांगावेसे वाटते की, आपणही संक्राती दिवशी सुवासिनीच्या वानाबरोबर एखाद्या विधवा महिलेस अशा प्रकारचे दान देऊन आपला सण साजरा करावा. यातूनच आपल्याला खर समाधान मिळते. माझी यावर्षीची संक्रांत नेहमीच माझ्या स्मरणात राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.