भिलवडीत पुत्र गमावलेल्या कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी
भिलवडी | ९/६/२०२१
भिलवडी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे कोविड केंद्र उत्तमरीत्या संचलित केले जात असून समाजातील विविध स्तरातून मदत उपलब्ध होत आहे. याचदरम्यान आपले दुख: बाजूला सारत एका पुत्र गमावलेल्या कुटुंबाने खारीचा वाटा उचलल्याचे पहायला मिळाले.
अवघ्या ४ महिन्यापूर्वी आपला २२ वर्षीय मुलगा सौरभ याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अचानक झालेल्या या आघाताने आई वडील खचून गेले तरीही यातून सावरत समाजातील कुणालातरी आजारपणात मदत व्हावी या हेतूने मुलाच्या स्मरणार्थ भिलवडी ग्रामपंचायत संचलित कोविड केंद्रास ५००० रु. ची यथाशक्ती मदत केली. त्यांची हि मदत सर्वांसाठीच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी अशीच आहे.
या पुढील काळातही समाजातील विद्यार्थी व इतर घटकांना शक्य ती सर्व मदत करीत आपल्या मुलाच्या आठवणी जपण्याचा व्यक्त केलेला निर्धार, दातृत्वाची जाणीव वृद्धिंगत करणारा आहे. आजच्या काळात सामाजिक भान दुर्मिळ होत असताना या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाने व्यक्त केलेली भावना पथदर्शी आहे.
सदर मदतीचा धनादेश भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांचे कडे सौ.भारती व श्री.संजय कवठेकर, कृष्णाकाठ फौंडेशन चे अध्यक्ष अमोल वंडे यांनी सुपूर्द केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.