ll महापुरातील महामेरु - डॉ.विश्वजीत कदम ll
शेतात चक्कर टाकून घरी आलो. इतक्यात विघ्नहर्ता गजानन नरळेचा कॉल,
'सर कुठाय? घाटावर या, बाळासाहेबांची बोट घेऊन आलोय!'
मी धावतच घाटावर आलो. पंधरा सोळा फुट लांबीची बोट बघता बघता पाणी कापत माझ्या जवळ घाटाच्या पायरीला आली. बोटीचा आकार इतका भारीकी बोटीच्या तिन्ही बाजूंनी स्टेप वरून पाय टाकून बोटीत येण्याची सोय. नितीन गुरव दादाने हात देत बोटीत घेतले. संतगावच्या दिशेने बोट धावू लागली. मागे ड्रायव्हिंगला बघतो तर कॉलेजचा वर्गमित्र सोन्या. त्याच्यासह भारती विद्यापीठाच्या चौदा कर्मचाऱ्यांना बोट चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं समजलं. औदुंबरच्या लोकार्पण सोहळ्यास पूर परिस्थितीमुळे जाता आले नव्हते. त्यावेळचे सर्व पत्रकार बंधूंचे लाईफ जाकेटवरील फोटो बघून हेवा वाटला.
संतगावच्या किनाऱ्यावर येताच पावसाने गाठले. तसंच भिजत काही अंतर पुढे निघालो. बोटीतील चौघेही बोटीवरून बाळासाहेबांचे कौतुक करताना थकत नव्हते. त्यामुळे साहजिकच बाळासाहेबांचे, साहेबांचे विचार डोक्यात तरळायला लागले.
कारण गेल्या दोन वर्षात जेव्हा जेव्हा बाळासाहेब गावात येऊन जातात तेव्हा तेव्हा माणसं पतंगराव साहेबांची आठवण काढून आजही हळतात. कारण या आमणापूर गावाला पूलाच्या माध्यमातून साहेबांनीच जगाच्या नकाशावर आणलं. ती कृतज्ञता आजही गावकऱ्यांकडून व्यक्त होताना दिसते. मागील वीस पंचवीस वर्षात पाहिलेल्या साहेबांच्या अनेक सभा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. प्रत्येक सभेत उगळे भाऊंनी प्रस्तावना करताना १९७८ सालापासूनची साहेबांची घोडदौड सांगायची, परिसरातील प्रश्न, कोणत्या निधीतून, फंडातून समस्या सोडवायची हे मांडून लांबलचक भाषण आटोपायचं. मग मनोगताला उठलेले साहेब भाषणातून रान उठवायचे. परिसराच्या विकास कामांसाठी कुठेकुठे किती निधी मंजूर केलाय सगळं तोंडपाठ. शेवटी हा मोठ्या मनाचा राजा माणूस उगळे भाऊंनी सांगितलेल्या कामावर यायचा. कामासाठी सुचवलेल्या आकड्यांपेक्षा जास्त निधी दिल्याचे क्षणात जाहीर करायचे. वर 'आता कामात काय हायगय करायची नाय!' असा दम भरायचे. बोटीतून जाताना हि निर्णयक्षमता, हि दानत वारशानं बाळासाहेबांकडे चालून आलीय असं वाटू लागलं. दुर्दैवाने या गेल्या तीन वर्षात कृष्णाकाठाला धक्क्यावर धक्के बसत गेले. आधी उगळे भाऊ, मग कदम साहेब गेल्याने काठाला पोरकेपण आलेलं. त्यातच गतवर्षीचा महापूर दारात उभा ठाकला. तसं प्रत्येक माणसाच्या तोंडून फक्त एकच वाक्य ऐकायला येत राहिलं.
"आज साहेब पाहिजे होतं!"
संकटात माणसाला देव आठवतो. पण लोकांना आठवलेले सोनहिऱ्याच्या खोऱ्यात जन्मलेले साहेब देवमाणूसच!
महापुराचं पाणी वाढत असतानाच बाळासाहेब कृष्णाकाठच्या गावागावात भेट देत राहिले. सत्ता नसली तरी आपल्या माणसांसाठी जेवढं शक्य तेवढं मदतकार्य सुरू ठेवलं. अवघा पश्चिम महाराष्ट्र महापूरात बुडत असतानाच सत्तेला महासत्तेच्या विजययात्रेचे डोहाळे लागलेले. परिस्थिती हाताबाहेर निघाली. पुरात अडकलेली जनावरं दावणीला बुडू लागली. माणसं बोटीसाठी टाहो फोडू लागली. यंत्रणा अपूरी पडत असतानाच पूरग्रस्तांना धीर देताना बाळासाहेब म्हणाले,
'माझा शब्द आहे तुम्हाला, मी इथं थांबणारायं, इथली माणसं हलल्याशिवाय विश्वजीत कदम जाणार नाही'
या भूमिकेने खचलेल्या पूरग्रस्तांना बळ दिलं. पूरात अडकलेल्या हजारो माणसांसाठी बोट किती गरजेची आहे हे पावलोपावली जाणवत असतानाही सत्ता नसल्याने हात बांधलेले. तरीही पायाला जखम झाली असतानाही हा माणूस पुरग्रस्तांसाठी चिखलापाण्यात फिरताना, रात्रीचा दिवस करताना कृष्णाकाठ पहात राहिला.
इतक्यात महापुराने झोप उडवलेल्या कृष्णाकाठावर घडलेल्या आणखी एका हृदयद्रावक घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला. ब्रम्हणाळमध्ये नाव पलटल्याची बातमी हृदय पिळवटून टाकणारी. कोपलेल्या कृष्णामाईनं १७ जीवांना आपल्या पोटात घेतलं. ते विदारक दृश्य बघून अस्वस्थ तर सगळेच झाले. या अस्वस्थेतून,
' ब्रम्हणाळ घटनेची पुनरावृत्ती या कृष्णाकाठी पुन्हा होऊ देणार नाही, कृष्णाकाठचा एकही जीव पूरात बळी जाऊ देणार नाही.
हे त्याच रात्री बाळासाहेबांनी ठरवून टाकलं असावं. पूर ओसरत असतानाच अन्नधान्य, आरोग्य, स्वच्छता यावर झपाटून काम केल्यावर अशा आपत्तीच्या काळात मदत करता येईल असा शाश्वत पर्याय निर्माण केला.
'डॉ. पतंगरावजी कदम आपत्ती निवारण निधी' या निधीच्या माध्यमातून त्यांनी पंचवीस हजार पुरग्रस्तांसाठी संसार उपयोगी साहित्याचं वाटप केलं. आभाळ फाटून पुरात घरदार उध्वस्त झालेल्या कुटूंबाना ही मदत लाखमोलाची ठरल्याचं या जमीनदोस्त घरांच्या बातम्या करताना माझ्या लक्षात आलं. त्याचवेळी माझे वडील गेल्यावर घरी आलेल्या बाळासाहेबांनी घरभर सुकत पडलेला पुस्तकांचा पसारा बघत पाठीवर हात टाकून आधार दिला. एकेक प्रसंग डोळ्यासमोरून सरकत असताना आठवणींचे हुंदके दाबत आमणापूर पुलाकडे कधी आलो समजलेच नाही. बोटीतील पुढच्या बाजूला असणाऱ्या ओपनिंग स्टेपने सगळे तिथे चहापानाला उतरले. चहा घ्यायचा नसल्याने आम्ही तिघे बोटीतच राहिलो. नितिनदादा, गजानन या बोटीच्या अत्याधुनिकतेचे कौतुक करायला लागले.
'बाळासाहेबांनी टॉप काम केलं, देशात आसली बोट नाय, म्हणून नेदरलँड मधून बोट आणल्या, रेस्क्यूला एक नंबर हाय बघा सर! कितीबी माणसं अडकली, तवातवाच बाहेर काढणार आम्ही या बोटीतनं!'
महापूराच्या पाण्यात या दोघा देवदूतांना बाळासाहेबांनी दिलेल्या बोटीविषयी इतकं आश्वासक बघून समाधान वाटले. कारण आजवर नावेच्या मागणीसाठी अनेक बातम्या दिल्या. पलुसच्या दोन आढावा बैठकीत बाळासाहेबांना बोटींविषयी विचारले. ब्रम्हणाळच्या रस्ता आणि बोटीचा प्रश्न मांडला. त्याचं समर्पक उत्तर आज या बाळासाहेबांच्या बोटींनी दिलं.
मी त्यांना बोटीतून खाली उतरून पुलावरून घरी जातो म्हणालो. पण दोघांनी बोटीतून सोडतो म्हणत बोट चालवण्यासाठी आग्रह धरला.
'नावंची आवलं मारायचा नाद हाय, मग हे पण जमलं पाहिजे!'
म्हणत हातातील हँडीकॅम काढून घेत गजाननने बोट चालवायला बसवलं. मग दबकत दबकत नितीनदादाच्या मार्गदर्शनाखाली इंजीनची मुठ पकडली. धारेचा प्रवाह कापत पाणी उडवत आयुष्यात पहिल्यांदाच ही इंम्पोर्टेड बोट चालवताना अंगावर शहारा आला. बघता बघता घाटावर पोचल्यावर उतरत बोटीला मनोमन हात जोडले.
ब्रम्हणाळ दुर्घटनेच्या अस्वस्थेतून आलेली ही बोट बाळासाहेबांमधील एका संवेदनशील, दूरदृष्टीच्या नेतृत्वाची आणि दातृत्वाची साक्ष पटवून देणारी आहे असं वाटत राहिलं.
©संदीप नाझरे, /९७६६६८९४३३
आमणापूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.