Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भिलवडीच्या इतिहासाचं आध्यात्मिक सांस्कृतिक पर्व - कविवर्य संभाजी आण्णा


भिलवडीच्या इतिहासाचं आध्यात्मिक सांस्कृतिक पर्व  - कविवर्य संभाजी आण्णा

|| कविवर्य संभाजी आण्णांचे चरित्र ||

कृष्णाकाठ न्यूज - विशेष - दि. २८/०४/२०२३ 

कविवर्य संभाजी आण्णांचा जन्म कृष्णाकाठी भिलवडी गावी इ.स.१७०७ श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीस  कोष्टी घराण्यात झाला .वडिलांचे नाव कोणाप्पा व आईचे नाव सत्यवा होते . त्यांच्या पोटी शिवा ,संभा आणि बाबा अशी तीन देवांचा अवतार असलेले भावंडे जन्माला आली, संभा अर्थात संभाजी आण्णा यांना लहानपणीच शंकराची पुजा करण्याचा छंद लागला.

संभाजी आण्णा नेहमी अध्यात्मिक ज्ञान , तत्वज्ञान यांच्यावर आभ्यास करीत . महाराष्ट्राची सांस्कृतिक कला असलेल्या लावणीचा पाया भेदिक आहे व त्यातून त्यांना अश्या भेदिक कला ,गाण्याचा छंद लागला त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली .त्यावेळी त्यांना राजू तांबोळी जोडीदार मिळाला , या दोघांना मिळून काव्य रचना केली .

तासगाव येथील बापूजी पाटील यांचे शिष्य श्री.रामानारू (गाव : मणेराजुरी ) यांची गुरुदक्षिणा घेऊन गाण्याचा फड उभा केला आणि देशभर लौकिक मिळवला . संभा व राजू यांनी मिळून    कवित्व केले त्या कवित्वला त्यांनी “संभूराजू”असे नाव दिले.  संभाजी आण्णांचे अध्यात्मिक ज्ञान अपार होते. 

भेदिक शाहिरी परंपरेत 'कलगी' आणि 'तुरा' या दोन्ही पक्षांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. ही भेदिक शाहिरी 'डफगाणे' या नावाने यादवकालीन  राजवटीपासून ओळखली जाते. वडवाळसिद्ध नागेश यांनी या भेदिक शाहिरीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यानंतर  या नाथसंप्रदायी भेदिक शाहिरीला महत्त्वपूर्ण योगदान जर कोणी दिले असेल तर कलगी पक्षाचे शाहीर हैबती आणि तुरा पक्षाचे संभाजी कोष्टी भिलवडीकर तथा शंभू-राजू भिलवडीकर यांनी. 

कलगी आणि तुरा पक्षाच्या या प्रमुख शाहिरांनी गण, गवळण,अध्यात्मिक लावण्या, साकी, पद व  ऐकिव या स्वरूपातल्या रचना करून भेदिक शाहिरीला खऱ्या अर्थाने चालना दिली. त्यामुळे विसाव्या शतकातील भेदिक शाहिरी आणि आजची भेदिक शाहिरी शाहीर हैबती आणि शंभू-राजू यांच्या काव्यरचनावरच चालताना दिसते.

    या भेदिक शाहिरीतील 'तुरा' पक्षाचे प्रणेते मानले जाणारे शंभू-राजू म्हणजेच यातील संभाजी कोष्टी यांनी दोन लाख कवणे रचली.  भिलवडी या ठिकाणी या संभाजी अण्णांची  समाधी असून तिथे प्रतिवर्षी  वैशाख शुद्ध नवमीला पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. अनेक कलगी व तुरा पक्षाच्या भेदिक शाहिरांचा आखाडा भरतो. पाच रंगाची पाच निशाने लावून बिद्रावळ सादर केली जाते. असे हे संभाजी कोष्टी मराठी तमाशाचे प्रेरणास्थान मानले जातात.कारण लोकनाट्य तमाशाचे आद्य कर्ते उमाजी कांबळे हे संभाजी कोष्टी यांचे शिष्य आहे. व त्यांचे सहकारी बाबाजी साठे म्हणजे मराठी तमाशा ' मोहना बटाव' या पहिल्या वगाचे रचनाकार होत.

कविवर्य संभाजी आण्णां यांनी शेवटी शके १८१० वैशाख शुद्ध नवमी ला वर रविवार या तिथी वर देह ठेवला, दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीला ,संभाजी अण्णांची पुण्यतिथी सोहळा भिलवडी  येथे साजरा केला जातो. 

वंशज शंकर गुराप्पा कोष्टी (अण्णा) हे  २००२ पर्यंत  त्यानंतर त्यांचे पुत्र  मनोहर शंकर कोष्टी  हे २०१८ साली अंतिम श्वासापर्यंत सेवेत राहिले. आत्ता  श्री अशोक अप्पासो कोष्टी यांनी पूर्ण वेळ सेवा कार्यात वाहून घेतले आहे . 


दि. २९ एप्रिल २०२३ - पुण्यतिथी सोहळा 


शासनाच्या मदतीने समाधी मंदिराची सुधारणा होत आहे.  महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीचे आद्य प्रेरणास्थान, भेदिक रचनाकार  कविवर्य संभाजी आण्णांच्या स्मृती जपणं काळाची गरज असून त्यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे.  


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.