Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

माणदेशचा मानबिंदू : सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे

माणदेशचा मानबिंदू : सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे


मेंढपाळाचा मुलगा व्हाया आयआरएस अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास 

"मंजिलें उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है
पंखो से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है"
    परिस्थिती, गरिबी अथवा येणारी संकटे तुम्हाला शिक्षण आणि तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाहीत. फक्त तुमच्याकडे हवी जिद्द. हीच जिद्द तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी पुल तयार करील... वेळोवेळी येणार्‍या ...अडचणींवर मात करण्यासाठीचा मार्ग दाखवेल...अशीच एक जिद्दीची संघर्षमय आणि प्रेरणादायी अशी कहाणी सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांनी लिहलेली आहे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ...
      सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी अशी ओळख असलेल्या आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावातून मेंढपाळाचा मुलगा म्हणून सुरू झालेला प्रवास व्हाया एमबीबीएस, आयआरएस बनून कार्पोरेट जगताचे मुंबईतील महत्वाचे केंद्र असलेल्या बीकेसी येथील आयकर कार्यालयातील पोहोचला आहे. तरूणाईला अखंड प्रेरणा देणार्‍या आयडॉल डॉ. सचिन मोटे यांचा 30 एप्रिल रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा घेतलेला आढावा ...
        आपला गाव सोडून जगायला जाणं... ही संकल्पना मेंढपाळ समाजाच्याबाबतीत जगाच्या पाठीवर केवळ माणदेशात पहावयास मिळते. व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी या कादंबरीत जगायला जाणं म्हणजेच काहीकाळ मेंढयांचे ओझे पाठीवर घेवून दोन घास खाण्यासाठी गावोगावी भटकंती करणं असं मानलं गेलं. जगायला जात असताना कुठलं आलं करिअर आणि कुठलं आलं भविष्य पण एखादया मेंढपाळाच्या पोरांन या सगळया परिस्थितीवर मात करत जर आई वडीलांच नाव सातासमुद्रापार नेलं तर नवलं नाही का ? पण हे घडलं आहे. आटपाडी तालुक्यातील विभूतवाडीच्या मोटे कुटूंबियाच्याबाबतीत... सचिन नावाच्या वंशाच्या दिव्यानं अठराविश्‍व दारिद्रयावर मात करत पहिल्यांदा डॉक्टर आणि नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त (आयआरएस) पदाचे लख्ख यश मिळविलं आणि मोटे दांपत्यांच्या डोळयाचं पारणं फेडलं...!
       विभूतवाडी हे सांगली - सातारा सीमेवरचे आणि आटपाडी तालुक्यातील जमतेम दोन - अडीच हजार लोकसंख्येचं गाव, कायमस्वरूपी दुष्काळी हा या भागास लागलेला कलंक, पण इथे गुणवत्तेचा सुकाळ असल्याचे डॉ. सचिन मोटे यांच्या यशाने सिध्द केले. वडील बिरा दगडू मोटे आणि आई सुभद्रा यांच्या वाटयाला वंशपरंपरागत मेंढपाळ हा व्यवसाय आलेला. या अशिक्षीत दांपत्याला शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता. केवळ शंभर मेंढयांची संपत्ती वाटयाला आली. आपल्या मुलाबाळांना सोबत घेवून वर्षातील सहा महिने घरादाराला कुलूप लावून मेंढपाळ म्हणून गावाबाहेर जगायला जायंच. मोटे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडील बिरा हे पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय करायचे. शेती होती पण तीही माळरानाची, बिनपाण्याची. त्यामुळे घरी आर्थिक चणचण भासायची. त्यात मेंढपाळ व्यवसायातून मिळणारे उत्पन्न ही तुटपुंजे. त्यामुळे घरखर्च कसा तरी चालायचा. सचिन यांचं प्राथमिक शिक्षण गावातल्याचं जिल्हा परिषद शाळेत झालं. कधी शाळेत जायचे तर कधी पोटाच्या मागे आई वडीलांसोबत भटकंती करायची. पण आटपाडीचेच एक महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांच्या कवितेत म्हटले आहे ना...            
'बीन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
  झाडे, वेली, पशु, पाखरे यासी गोष्टी करू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊं कड्या दुपारी पर्‍हात पोहू
  मिळेल तेथून घेऊन विद्या अखंड साठा करू‘
          या कवितेप्रमाणे शालेय शिक्षणापेक्षा माणसाला निसर्गच खुप काही शिकवून जातो. त्याप्रमाणे सचिन मोटे हे देखील निसर्गाच्या सानिध्यात समृध्द झाले. गावातल्याच हायस्कूलमध्ये सन 2004 ला दहावीची परिक्षा दिली त्या परीक्षेत ते केंद्रात प्रथम आले. अर्थात मेंढपाळ असणार्‍या त्याच्या त्या मायबापाला हे यश आभाळाऐवढे वाटले. त्यांनी सचिन यांना आता पुढे शिकवायचे असे ध्येय उराशी बाळगले. त्यासाठी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बारावी विज्ञान शाखेत त्यांनी कराड केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. आणि हा माणदेशचा हिरा खर्‍या अर्थाने चमकणार अशी सर्वांचीच खात्री झाली. पुढे जिद्दीने, कष्टाने, आणि परिश्रमाने एम.बी.बी.एस. शिक्षणासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम समजल्या जाणार्‍या मुंबईच्या जे. जे. हॉस्पीटलमध्ये प्रवेश मिळविला. अथक परिश्रमानंतर आणि अभ्यासाच्या जोरावर डॉक्टरकीची पदवी मिळवली होती.
      डॉक्टरकीपेक्षा सामाजिक कार्यात स्वारस्य असणार्‍या डॉ. सचिन मोटे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान अभ्यासातील हुशारी आणि गुणवत्ता पाहून बाजीराव पाटील यांनी त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला देवून मार्गदर्शन केले. लहानपणापासूनच आपण मोठे झाल्यावर "साहेब व्हायचेच" असं स्वप्न उराशी बाळगल होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी ते झपाटून दररोज 14 - 14 तास अभ्यास करत होते. परिस्थितीला कधीही आड येवू दिले नाही. ध्येय डोळ्यासमोर ठेवून संघर्षमय वाटचाल करीत राहिले. 
      स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक अडथळे आले. परंतु त्याही कठीण परिस्थितीत त्यांनी कधीच हार मानली नाही. प्राप्त परिस्थितीला सामोरे जात खंबीर आत्मविश्वासाने, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नेटाने सुरू ठेवला. स्पर्धा परीक्षेत चमकण्यासाठी धडपणार्‍या सचिन यांना अनेक मित्रांकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळत गेले. अखेर सन 2016 च्या आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होवून डॉ. सचिन मोटे यांनी आयआरएस ही बहुमानाची पदवी मिळविली. अन त्यांची थेट निवड सहाय्यक आयकर आयुक्तपदी निवड झाली. सांगली जिल्हयाच्या धनगर समाजाच्या इतिहासात हा सुवर्णक्षण होता. युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होणारे डॉ. सचिन मोटे हे सांगली जिल्हयातील धनगर समाजातील पहिलेच युवक ठरले आहेत. चक्क एक मेंढपाळाचा मुलगा देशपातळीवरील सेवेत रूजू झाला होता. अख्या आटपाडी तालुक्यातील जनतेला त्याच्या यशाचे कौतुक वाटत होते. डॉ. सचिन मोटे यांनी मिळवलेल्या या अफलातून यशाचे सेलिब्रेशन चक्क हत्तीवरून साखर वाटप करून करण्यात आले. सध्या डॉ. सचिन मोटे हे मुंबईत सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 
       निसर्गाने दुष्काळाचा कलंक माथी मारलेल्या आटपाडी तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी इथल्या भूमिपुत्रांमध्ये कमालीची जिद्द आहे. इथल्या अनेक भूमिपुत्रांनी आपले कर्तृत्व सिद्ध करत विविध क्षेत्रात झेंडा फडकविला आहे. अशाच आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावच्या एका सर्वसामान्य धनगर कुटुंबातील मेंढपाळाचा सुपुत्र असणार्‍या डॉ. सचिन मोटे यांनी यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहायक आयकर आयुक्त या पदाला गवसणी घालत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. दुष्काळी भागातील एका मेंढपाळाचा मुलगा ते सहायक आयकर आयुक्त हा प्रवास अतिशय खडतर असला तरी तो आजच्या पिढीसाठी तितकाच प्रेरणादायी आहे.
     एखाद्या युवक अधिकारी झाला की हुकूमशहा झाल्यासारखं वागणारे अनेकजण पाहिले आहेत. अधिकारी पदाची झूल अंगावर चढल्यावर अनेकांना आकाश ठेंगणे होते. पदाचा उन्माद आणि बडेजावपणा काही औरच असतो. परंतु डॉ. सचिन मोटे यांनी आपली सहायक आयकर आयुक्त पदाची कारकीर्द जनसेवेसाठी द्यायची असा निर्धार करून ते कार्यरत आहेत.  गेल्या तीन वर्षांपासून आपली ऑफिशियल जबाबदारी सांभाळून आपल्या माणसासाठी अहोरात्र सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. 
     कोरोनाच्या संकटकाळात ही दानशूर गलाई बांधवांच्या सहकार्याने आटपाडी तालुक्यातील गरजू रुग्णाना आणि रूग्णालयांना ऑक्सिजन मशीन भेट दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक अभिनव उपक्रम म्हणून खानापूर - आटपाडी तालुक्यातील शेकडो कुटुंबाना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप तसेच हिंगणगादे येथील दिव्यांग महिलेला व्हिलचेअर भेट देवून साध्य फौंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
      आपल्या जनसेवेच्या कार्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी डॉ.सचिन मोटे यांनी 'साध्य फौडेशन'ची मुहूर्तमेढ रोवली. देशभरात विखुरलेल्या गलाई बांधवांच्या सहकार्याने आणि ऑल इंडिया गलाई असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी एक विधायक जनसेवेचे व्यासपीठ म्हणुन साध्य फौंडेशनची स्थापना केली.
     औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक विषयांना प्राधान्य देऊन आपल्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प साकार करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थान मानुन काम करण्याचा संकल्प साध्य फौंडेशनने केला आहे. लोकांना सोयी सुविधा देताना जनसेवेचा वसा अखंडीत ठेवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक विधायक फौंडेशन म्हणून काम करणार असून शेती, शेतकरी, विद्यार्थी आणि उपेक्षीत घटकांचे हे हक्काचे व्यासपीठ बनविणे हे साध्य फौंडेशनचे मुख्य
उद्दिष्ट आहे.
     भरकटलेल्या तरुणांना दिशा देण्यासाठी डॉ सचिन मोटे यांनी साध्य फाऊंडेशनच्या माध्यमातून  सक्षम व प्रगल्भ बनविण्यासाठी विटा आणि आटपाडी येथे फाईव्ह स्टार लायब्ररी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे योजिले आहे. तालुक्यातील युवकांना लोकसेवा व सरळसेवा तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास या लायब्ररीत करता येणार आहे, तसेच तरूणांना क्लासवन अधिकारी यांच्याकडुन वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले येणार आहे. या मार्गदर्शन केंद्राचे काम पुर्ण झाले आहे. लवकरच ही दोन्ही मार्गदर्शन केंद्रे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
    स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी तरूणांना पुणे, मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर अशा मोठमोठ्या शहरात जावं लागतं. परंतु आता त्यांना आटपाडीतच प्रशिक्षण घेऊन अभ्यास करता येणार आहे, ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे अशा तरूणांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणं पेलवत नाही. म्हणुनच त्यांच्यासाठी साध्य फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील मुलं स्पर्धेच्या युगात मागे पडतात त्यांना न्याय मिळावा म्हणून विटा आणि आटपाडी येथे निः शुल्क सुसज्ज फाईव्ह स्टार लायब्ररी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे.
      पहिल्या टप्प्यात साध्य फौंडेशनतर्फे भिवघाट येथे केंद्रस्थान म्हणून एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, खानापूर, आटपाडीसह अन्य भागात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करणे, शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा संकल्प डॉ. सचिन मोटे यांनी केला आहे.
     एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व, आपल्या मातीशी नाळ जपणारे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे माणदेशचा मानबिंदू असलेले सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडो, याच वाढदिवसाच्यानिमित्ताने शुभेच्छा ...!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.