Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

हीरक महोत्सवी ज्ञानपीठ : भारती विद्यापीठ


हीरक महोत्सवी ज्ञानपीठ : भारती विद्यापीठ 

कृष्णाकाठ न्यूज    दि. १० मे २०२३ 

- अमोल वंडे / भिलवडी : ९८९० ५४६ ९०९


समाजातील उपेक्षित व बहुजन समाजाचे जीवन शैक्षणिक क्रांतीतूनच बदलू शकते याची जाण  व तळमळ असणाऱ्या संस्थापक  डॉ. पतंगराव कदम साहेबांनी "गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन" हे  ध्येय उराशी ठेऊन भारती विद्यापीठाची स्थापना १० मे १९६४ रोजी पुणे येथे केली. हाच अभिमानास्पद शैक्षणिक प्रवास हीरक महोत्सवी होत आहे याचा आनंद अवर्णनीय आहे. 

महाराष्ट्राचे माजी मंत्री, कर्तृत्वसंपन्न कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारती विद्यापीठ हीरक महोत्सवी स्थापना दिन साजरा करीत आहे. कुटुंब प्रमुख मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब यांचे आशीर्वाद, डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम (सर) यांचे मार्गदर्शन भारती विद्यापीठाला  सातत्याने लाभत आहे. कोविड सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत भारती हॉस्पिटल व  डॉ.अस्मिता जगताप  यांनी केलेले कार्य संस्मरणीय असेच आहे.  २१ व्या शतकात भारती विद्यापीठाचा गौरवशाली हा  प्रवास देशाला प्रेरणा देत आहे. 

१९६३ च्या सुमारास डॉ. पतंगराव कदम साहेब शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या लक्षात आले की, अनेक महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही किंवा स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही.  इंग्रजी आणि गणित यांसारख्या विषयांमध्ये या विद्यार्थ्यांचा तुलनेने कमकुवत पाया हे त्याचे मूळ कारण आहे. या दोन विषयांची विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भारती विद्यापीठाने स्थापनेपासूनच शालेय मुलांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यास सुरुवात केली. 

गेल्या ६० वर्षात भारती विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात, विशेषतः उच्च आणि व्यावसायिक शिक्षणात जगाला प्रेरक अशी प्रगती केली आहे.आज, भारती विद्यापीठाचे  नवी दिल्ली, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा आणि पाचगणी आणि इतर ठिकाणी कॅम्पस आहेत. भारती विद्यापीठ ही  महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे ज्यांची शाखा भारताच्या राजधानीत आहे. केवळ शहरी भागातच भारती विद्यापीठाने संस्था सुरू केल्या आहेत असे नाही तर  शाळा आणि महाविद्यालये ग्रामीण भागात आणि अगदी दुर्गम आदिवासी आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागातही आहेत. 

आज भारती विद्यापीठाच्या  पूर्व-प्राथमिक शाळांपासून पदव्युत्तर संस्था आणि पूर्ण व्यावसायिक विद्यापीठ (BVDU) अशा विविध प्रकारच्या १९० हून अधिक देशासह परदेशात शैक्षणिक शाखा आहेत. भारती विद्यापीठाच्या  ८०  हून अधिक शाळा आणि ६०  हून अधिक उच्च शिक्षण शाखा कार्यरत आहेत, ज्यात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश आहे. यामध्ये वैद्यकीय , दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, फार्मसी, कायदा, जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, कृषी, शारीरिक शिक्षण आणि बरेच काही महाविद्यालये आहेत. संशोधन उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि आपल्या कॅम्पसमध्ये संशोधन संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, भारती विद्यापीठाने आरोग्य संबंधित विज्ञान, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, उपयोजित रसायनशास्त्र आणि सामाजिक विज्ञान या क्षेत्रांमध्ये ६ हून अधिक  विशेष संशोधन संस्था स्थापन केल्या आहेत.

दूरदृष्टी असलेल्या डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी भारती विद्यापीठ सह संलग्न आणि इतर अनेक संस्था  सुरू केल्या. त्यामध्ये विविध प्रकारच्या बँक, सहकारी संस्था, अनेक ट्रस्ट, काही सामाजिक सेवा संस्था यांचा समावेश होतो.

डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी भारती विद्यापीठाच्या संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेला नेहमीच महत्त्व दिले. भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, अनुकूल वातावरणात अद्ययावत आणि उत्कृष्ट शिक्षण मिळावे यावर त्यांनी नेहमीच भर दिला.  भारती विद्यापीठा मध्ये सुसज्ज समृद्ध पायाभूत सुविधा, सुसज्ज ग्रंथालये आणि प्रयोगशाळा, सुविकसित आणि विस्तीर्ण क्रीडांगणे यासह जागतिक दर्जाच्या गुणवत्ता निकष आहेत. 

भारती विद्यापीठाच्या या वाटचालीत २६ एप्रिल १९९६ हा गौरवाचा दिवस ठरला. या दिवशी भारत सरकारने, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार, भारती विद्यापीठाच्या १२ संस्थांच्या क्लस्टरला त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेला  प्रमाण मानून  "डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी" चा दर्जा दिला. भारती विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या डॉ. कदम यांच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस होता. अशा प्रकारे त्या दिवशी भारती विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) अस्तित्वात आले.

देशातील बहुतेक डीम्ड विद्यापीठांपेक्षा वेगळे, भारती विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) कदाचित सर्वात मोठ्या बहु-विद्याशाखीय आणि बहु-कॅम्पस विद्यापीठांपैकी एक आहे, सध्या त्याच्या छत्राखाली ३२  महाविद्यालये आणि विविध विषयांच्या शाखा कार्यरत  आहेत.

लाखों विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे भारती विद्यापीठ हे  नवीन शैक्षणिक धोरण - २०२० सह  येणाऱ्या काळातील सर्वच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी  सक्षमपणे उभे आहे. आज डॉ.पतंगराव कदम साहेब आपल्यात नसल्याची खंत निश्चित आहे, मात्र भारती विद्यापीठाचा हा प्रवास त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष निरंतर देत आहे.  भारती विद्यापीठ हीरक महोत्सव साजरा करीत अमृत महोत्सवाकडे दैदीप्यमान वाटचाल करीत आहे. 

आदरणीय साहेबांच्या प्रेरणेने व मा. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाकरीता कार्यरत असल्याचा निश्चित अभिमान आहे व  नाविन्यपूर्णरित्या योगदान देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. आपल्या भारती विद्यापीठ परिवारातील सर्वांना ५९ वा वर्धापन दिन व सुरु होत असलेल्या हीरक महोत्सवी वर्षाच्या  मन:पूर्वक शुभेच्छा..!

- अमोल वंडे

सहाय्यक प्राध्यापक, संगणक शास्त्र विभाग,
भारती विद्यापीठाचे , डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.